M arathi Sahitya - Mrugjal- Ch 4 कशी आहेस?


Marathi Sahitya - Mrugjal- Ch 4 कशी आहेस?

शेवटी संधी साधून आणि मित्रांच्या नजरा चुकवून विजयने प्रियाला एकटे गाठलेच. ते दोघेही खुप दिवसांनंतर समोरा समोर भेटत होते.

"" कशी आहेस?'' विजयने तिची चौकशी केली.

"" तू कसा आहेस?'' प्रिया त्याच्या डोळ्यात पाहात म्हणाली.

कदाचित ती त्याच्या डोळ्यात आपलं प्रतिबिंब शोधत असावी.

"" बरा आहे'' विजयही तिच्या डोळ्यात पाहात म्हणाला.

काही क्षण काहीही न बोलता गेले. विजयने सभोवार एक नजर फिरवली आणि कुणाचंही त्याच्याकडे लक्ष नाही याची खात्री करुन तो म्हणाला.

"" तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं होतं''

प्रियाने काही न बोलता आपली मान खाली घातली. पुन्हा काही क्षण काही न बोलता गेले. कदाचित तो शब्दाची जुळवा जुळव करण्याचा प्रयत्न करीत असावा. पुन्हा विजयने सभोवार एक नजर फिरवली. यावेळी त्याला त्याची आईच त्याच्याकडे येतांना दिसली.

"" ते इथं बोलणं शक्य दिसत नाही..."" विजय निराशेने म्हणाला, "" बरं एक काम करं ... उद्या संध्याकाळी सहा वाजता ... कुठे भेटता येईल?... कुठे भेटता येईल?''

"" आपली नेहमीची जागा'' तिने सुचवले.

'' हो... आपली नेहमीची जागा... अशोक पार्क... ''

त्याची आई जवळ आलेली पाहताच, "" .. मी तुझी वाट पाहीन '' म्हणत तो तिथून सटकला.

जेव्हा त्याची आई तिथे आली तेव्हा अजुनही तिची मान खालीच होती. तिला काहीही बोलण्यास वाव मिळाला नव्हता. तिने विजय गेला त्या दिशेने पाहाले. तो त्याच्या मित्राच्या गृपकडे जात होता. जाता जात तो थबकला आणि त्याने वळून तिच्याकडे एक कटाक्ष टाकला.

एव्हाना विजयची बहिण शालीनी त्या युवकाच्या मागे मागे चालत पहिल्या मजल्यावर पोहोचली होती. तिने पहिल्या मजल्यावर व्हरंड्यात सभोवार नजर फिरवली. तिथे कुणीही नव्हतं. फक्त खालून लॉनमधून लोकांच्या बोलण्याचे आणि हसण्या खिदळण्याचे आवाज येत होते.
काही गडबड तर नाही...
शालीनीच्या मनाने शंका उपस्थित केली.


"" इकडे तर कुणीच नाही...कुठाय आई?'' शालीनीने हिम्मत करुन विचारलेच

तो यूवक थबकला आणि तिच्याकडे वळून पाहात म्हणाला,

"" तिकडे आहे ... एका रुममधे''

तिने एकदा त्या युवकाकडे बघितले. दोघांची नजरा नजर झाली. तिने त्याच्या मनात काय चालले असावे याचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या मनाचा काहीएक ठाव लागत नव्हता. पण त्याच्या नजरेत किंवा वागण्यात वावगं असं काहीच तिला जाणवलं नाही.
उगीच आपलं शंकाखोर मन...
तिने आपल्या मनाला बजावले.
तो पुन्हा वळून एका दिशेने चालू लागला आणि शालीनी त्याच्या मागे मागे चालू लागली. काही अंतर चालल्यानंतर तो एका रुमसमोर थांबला. शालीनीही त्याच्यामागे थांबली.

"" आत आहे तुझी आई'' तो तिला दरवाजाकडे इशारा करीत म्हणाला.

शालीनीने समोर जावून दरवाजा ढकलून बघितला. दरवाजा उघडाच होता. तिने एकदा वळून त्या यूवकाकडे बघितले.

"" आत जा '' त्याने बाहेर थांबतच आदेश सोडला.

तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहाले.

"" तू आत जा... मी इथेच बाहेर पहारा देत थाबतो'' तो म्हणाला.

"" पहारा?'' तिने आश्चर्याने विचारले.

"" हो पहारा... वेळच तशी आली आहे'' तो गुढपणे म्हणाला.

शालीनीला त्याच्या गुढतेमधे काय लपलेले आहे काहीच कळत नव्हते.
जाऊदे असेल काहीतरी...
तिने विचार केला आणि ती आत जायला लागली तसा तो पुन्हा बोलला,
"" आणि हो... आत गेल्याबरोबर आतून कडी लावण्यास विसरु नको''

शालीनी पुन्हा थबकली, "" का?''

"" जास्त प्रश्न विचारु नकोस ... जेवढं सांगितलं तेवढ कर'' त्याच्या आवाजात आता करडेपणा आला होता.

शालीनी चुपचाप एखाद्या यंत्रागत आत गेली आणि तिने आत जाताच दरवाजाला आतून कडी लावून घेतली.



क्रमश:.

5 comments: