Fiction book - Mrugajal - Ch- 11

e
Fiction book - Mrugajal - Ch- 11

प्रिया अंगणात खुर्चीवर बसून त्याची वाट पाहत होती. तो पी-1 च्या नोट्स आणायला आत गेल्यापासून बराच वेळ झाला होता.
हा नोट्स आणायला गेला की कशाला गेला आत...
प्रिया विचार करीत होती. तेवढ्यात तिला तिच्या खुर्चीच्या मागे शेजारी कुणीतरी येवून उभं राहाल्याची चाहूल लागली. तिने वळून बघितले आणि ती भितीने दचकून उभीच राहाली. तिच्या तोंडातून किंकाळी तेवढी निघायची राहाली होती. खुर्चीच्या मागे खुर्चीला धरुन एक 21-22 वर्षाची केस मोकळे सोडलेली वेडसर मुलगी उभी होती. ती एकटक प्रियाकडे पाहत होती आणि गालातल्या गालात विचित्रपणे हसत होती. तेवढ्यात नोट्स घेवून विजय घरातून बाहेर आला आणि तिच्या भेदरलेल्या चेहऱ्याकडे पाहून हसून म्हणाला,
'' अगं ही माझी मोठी बहिण शालिनी''
प्रियाने भितभितच तिला नमस्कार केला,
'' नमस्कार''
शालीनी काहीच प्रतिक्रिया न देता तिथून घरात निघून गेली.
प्रिया हळूच खाली खुर्चीवर बसली तसा विजय तिच्यासमोर खुर्चीवर बसत म्हणाला,
'' तिला थोडा ... यूनो.. सायकीयाट्रीक... प्रॉब्लेम आहे...''
'' हो मी समजू शकते.,.. आय ऍम सॉरी...''
'' यू निड नॉट फील सॉरी... आता आम्हाला सवय झाली आहे तिची'' विजय नोट्स तिच्यासमोर धरीत म्हणाला.
प्रियाने त्या नोट्स घेवून चाळून बघितल्या.
'' तुझं अक्षर फार सुंदर आहे... अगदी मोत्यासारखं '' त्याच्या नोट्स चाळता चाळता प्रिया म्हणाली.
'' तुझीही एक गोष्ट अगदी मोत्यासारखी आहे...'' विजय म्हणाला.
'' कोणती?'' ती त्याच्याकडे पाहात म्हणाली.
'' तुझे पांढरे शुभ्र दात'' विजय म्हणाला.
'' हो का?'' ती लाजून लाल होत खाली मान घालीत म्हणाली.
'' तु आमच्याकडे आलीस ... नोट्सच्या निमित्ताने का होईना ... बरं वाटलं '' तो म्हणाला.
यावर प्रियाला काय बोलावे काही कळेना.
"" नाही म्हणजे आमच्याकडे असं कुणी सहसा येत नसतं...'' तो पुढे म्हणाला.
कदाचित विजयच्या वेड्या बहिणीमुळे...
प्रियाने विचार केला आणि ती जाण्यासाठी उठून उभी राहात म्हणाली, '' ठिक आहे मग... मी दोन दिवसात तुझ्या नोट्स परत करीन.. अगदी डॉट दोन दिवसात''
'' आय नो ... यू वील'' विजय म्हणाला.
प्रिया नोट्स घेवून घराच्या फाटकाकडे निघाली होती आणि विजय तिच्या मागे मागे तिला फाटकापर्यंत सोडायला आला. तेवढ्यात फाटक उघडून एक 48-49 वर्षाचा माणूस जुनी सायकल घेवून फाटकाच्या आत आला. त्याचा घामेजलेला चेहरा, दाढीचे वाढलेले खुंट आणि चुरगाळलेले कपडे होते. तो आत आला आणि जसा प्रियाच्या जवळ आला प्रियाने आपले तोंड कसेसे केले कारण त्याच्या तोंडाचा दारुचा उग्र वास आला होता.
कोण हा दारुडा माणूस?...
आणि इकडे कुठे आत चालला...
कदाचित चुकून आला असेल?
प्रियाने विचार केला आणि विजयकडे पाहाले. पण विजय शांत उभा होता.
त्या माणसाने एक अनोळखी नजर प्रियाकडे टाकली आणि आपल्या पॅन्टच्या खिशात हात घालून स्वस्त सिगारेटचे पाकीट बाहेर काढले. पाकीट उघडून बघितले तर ते रिकामेच होते. त्याने ते रागाने अंगणात एका कोपऱ्यात भिरकावले. आणि खिशातून एक पन्नासची नोट काढून विजयच्या हातात देत म्हटले,
'' जा एक पाकिट घेवून ये''
प्रियाने विजयकडे पाहाले. की त्या माणसाच्या उद्दामपणाच्या बदल्यात विजय त्याला काहीतरी म्हणेल. पण विजयने आज्ञाधारकपणे ती नोट घेवून आपल्या खिशात ठेवली. आणि तो माणूस तशीच सायकल घेवून घराच्या आवारात शिरुन सायकल ठेवायला घराच्या मागे गेला. विजयने एक नजर प्रियाच्या चेहऱ्यावर टाकली आणि तिचे गोंधळलेले भाव ताडून म्हणाला,
'' हे माझे वडील''
यावर काय बोलावे न समजून प्रिया फाटकाच्या बाहेर जात म्हणाली, '' बरं मी येते''
प्रिया सायकलवर बसून निघण्याच्या तयारीत होती आणि तिला निरोप देण्यासाठी विजय उघड्या फाटकात उभा होता.
'' ओक बाय'' प्रिया सायकलला पायडल मारीत आणि विजयकडे बघत म्हणाली.
'' बाय'' विजय तिच्याकडे पाहून हात हलवत म्हणाला.
विजय बराच वेळ फाटकात तसाच उभा राहून तिच्या दुर जाणाऱ्या सायकलकडे बघत राहाला. अगदी ती नजरेआड होवून नाहीशी होईपर्यंत.



क्रमश:

2 comments: