Marathi Sahitya Literature Books - Madhurani - CH-4 ते दिवस

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi Sahitya Literature Books - Madhurani - CH-4 ते दिवस

 Read Novel - मधुराणी - Hony -  on Google Play Books Store
वाचा काही निवडक प्रतिक्रिया -  प्रतिक्रिया 
गणेशराव खुर्चीवर पाय मोकळे करून बसले. मधून मधून ते दरवाजातून भेटायला आत जाणाऱ्या आणि बाहेर येणाऱ्या लोकांकडे पाहत होते. त्यांनी एकदा हॉलमध्ये नजर फिरवली.
देव जाणे इतक्या लोकांमध्ये आपला नंबर केव्हा लागतो ते?...
तेवढ्यात त्यांना अचानक हॉलमध्ये हालचाल झालेली जाणवली. काही लोक उठून उभे राहत होते. तर काही जण माना उंचावून पाहत होते. काही जण नमस्कार करीत होते.
कोण आहे?... श्रेष्ठी तर नाहीत ना?...
त्या लोकांच्या गर्दीतून रस्ता काढीत जात असलेला त्यांना एक गोरा गोमटा उंचापुरा धीप्पाड मनुष्य दिसला.
आता हा कोण?...
तो मनुष्य दरवाजातून आत गेला - श्रेष्ठींना भेटायला- बिनदिक्कत. त्याला कुणीही अडविले नाही. तो गेल्यानंतर गर्दी पुन्हा आपल्या जागेवर बसून स्थिरावली.
" कोण होता तो?" गणेशरावांनी त्यांच्या उजवीकडे बसलेल्या माणसाला विचारले.
त्या माणसाने आश्चर्याने विचारले,
" काय? तुम्हाला माहित नाही?"
गणेशरावांनी ओशाळल्यागत आपली मान हलवून आपले अज्ञान व्यक्त केले.
" अहो ते मधूकरराव आहेत ... श्रेष्ठींचा खास माणूस... अगदी उजवा हातच म्हणानां"
" अच्छा ... अच्छा"
गणेशरावांच्या डावीकडे एक पांढरा कुर्ता पायजामा घातलेला माणूस पेपर वाचत बसला होता.
त्यांनी त्याच्याकडे बघत आळस देत म्हटले,
" आता काय माहित किती वेळ लागतो ते?"
त्या माणसाने पेपर तसाच समोर ठेवून पेपर वरून त्यांच्याकडे निरखून पाहिले.
" तुम्ही आताच आले ना? "
" हो" गणेशरावांनी उत्तर दिले.
" मी मागच्या दोन दिवसापासून चकरा मारतोय...पण श्रेष्ठींचा भेटायचा पत्ता नाही... कधी श्रेष्ठी नसतात ..तर कधी असतात... पण श्रेष्ठींना वेळ नसतो " असं जसं गर्वाने म्हणून तो पुन्हा पेपर वाचायला लागला.
गणेशरावच्या चेहऱ्यावर निराशा पसरली होती. क्षणभर त्यांना इथून उठून जावसं वाटलं.
पण नाही...भेटणं तर आवश्यक आहे ...
आपल्यासाठी नाही तर आपल्या मुलाच्या नोकरीकरीता तरी...
खुर्चीवर बसल्या बसल्या त्यांचं विचारचक्र भूतकाळात झेपावलं. त्यांना आठवत होतं 20-25 वर्षापूर्वी एकदा त्यांना असेच याला भेट त्याला भेट असे हेलपाटे खावे लागले होते. आणि एवढे खस्ते खावूनही त्याची पोस्टींग खेडेगावी झालीच होती.
आताही तर तसंच नाहीना होणार...
मागच्या वेळपेक्षा यावेळी बदली थांबवनं त्यांना आवश्यक वाटत होतं. कारण तेव्हा ते तरूण होते . दगदग सहन करू शकत होते. विचार करता करता त्यांना ते मागचे त्यांच्या तारूण्यातले दिवस आठवू लागले.....
.... बस घाटातून गिरक्या घेत चालली होती. गणेश खिडकीच्या जवळच्या सिटवर बसलेला होता. त्याच्या शेजारी एक खेडूत बसलेला होता. बसच्या गिरटयांनी होणारी मळमळ टाळण्यासाठी गणेश खिडकीतून घाटातील हिरवळीवर आपले लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न करीत होता. त्याने बसमध्ये बसलेल्या इतर प्रवाश्यांवरून एकदा आपली नजर फिरविली. कुणी पेंगत होते तर कुणी आपापसात गप्पा मारीत होते. गाडीच्या मधल्या रिकाम्या जागेतसुध्दा काही प्रवाशी उभे होते. कुणी मधे असलेल्या लोखंडी खांबाचा आधार घेऊन उभे होते तर कुणी बाजूच्या सिटचा आधार घेऊन उभे होते. त्या गर्दीतून रस्ता काढीत कंडक्टर आपल्या जागेजवळ गेला. त्याच्या सिटवर बसलेल्या माणसाकडे त्याने नुसते बघितले. त्या बसलेल्या माणसाने मुकाटयाने उठून कंडक्टरला बसायला जागा दिली. कंडक्टरने बसल्या बसल्या तिकीटांची बॅग चाळली आणि त्यातून एक कागद आणि पेन काढला. पेन कानाच्या मागे लावत त्याने त्या कचऱ्यात फेकून देण्याच्या लायकीच्या झालेल्या कागदाची घडी उकलली. मग तो एका हाताने तिकींटाचे नंबर पाहून दुसऱ्या हाताने कानामागचा पेन काढीत कागदावर लिहून घेत होता. तो हे सगळं इतक्या सफाईनं करीत होता की जणू त्यासाठी त्याला एखादं स्पेशल ट्रेनिंग दिलं असावं. नाहीतर बसचे इतके धक्के बसतांना कागदावर काही लिहिणं म्हणजे कठीणच नाही तर जवळ जवळ अशक्य होतं.
गणेशने पुन्हा आपली नजर खिडकीच्या बाहेर हिरवळीवर खिळविली. त्याचं विचारचक्र पुन्हा सुरू झालं. किती आटोकाट प्रयत्न करूनही ती वेळ त्याच्यावर आलीच होती. पाच वर्ष तिथेच तालूक्याच्या ठिकाणी कोर्टात डेली वेजेसवर कारकुणी केली. मग लग्नही केलं. आता पाचवर्षापर्यंतच्या प्रयत्नानंतर गणेशची ग्रामसेवक म्हणून नेमणूक झाली होती. ग्रॅजूएट असूनही त्याच्यावर ग्रामसेवक म्हणून काम करण्याची पाळी आली होती. तीही नोकरी सहजा सहजी मिळालेली नव्हती. सतरा जणांचे लग्गे लावून, विनवण्या करून, पाय धरून आणि वरून पैसे सुध्दा चारल्यानंतर... तेव्हा कुठे ग्रामसेवकाची नोकरी मिळाली होती. नोकरी मिळाल्यानंतर प्रश्न होता नेमणूकीचा. गणेशला तालूक्याच्या जवळ 4-5 किलोमिटरच्या आतच एखादया खेडयात नेमणूक हवी होती. पुन्हा लग्गे, विनवण्या आणि पैसे देणे आलेच. तेही केलं. पण नाही. जे व्हायला नको होतं तेच झालं. तो आपली पोस्टींग तिथेच जवळपास एखाद्या खेडयावर करून घेऊ शकला नव्हता. नोकरी लावण्याच्या वेळी लावलेल्या लग्यापेक्षा यावेळी त्याच्या लग्याचं वजन कदाचित कमी पडलं असावं. आणि शेवटी नाईलाजाने का होईना त्याला आता तालूक्यापासून 50 किलोमिटर असलेल्या उजनी नावाच्या खेडयात नेमणूक होऊन जावे लागत होते. आज तिथे जाण्याचा त्याचा पहिलाच दिवस होता.
क्रमश:...
The richest man is not he who has the most, but he who needs the least.
-unknown Author

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

1 comment: