Marathi Novels Books - Madhurani - CH - 6 सदा

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi Novels Books - Madhurani - CH - 6 सदा
 Read Novel - मधुराणी - Hony -  on Google Play Books Store
वाचा काही निवडक प्रतिक्रिया -  प्रतिक्रिया 
धूळ आणि धूर निवळल्यानंतर गणेशने आजूबाजूला बघितले, खिशातला रुमाल काढून चेहरा स्वच्छ केला, केस व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला, आणि कपड्यावरची धुळ झटकण्याचा प्रयत्न केला. गोठयाच्या समोर झाडाच्या सावलीत एका जून्या लाकडाच्या ओंडक्यावर काही लोक बसलेले होते. कुणी विडी ओढत होता तर कुणी चिलिम ओढत होता. सगळी लोक त्याच्याकडे असे बघत होते जसा तो एखादा परग्रहावरून आलेला माणूस असावा. असा शर्ट पँट घातलेला नीटनेटका माणूस इथे कदाचित फारच क्वचित येत असावा. गणेश त्यांच्याकडे जावू लागला. एका तंबाखुचा बार चोळणाऱ्या खेडूताजवळ तो जाऊन उभा राहिला. त्या खेडूताने डाव्या हातावर चोळलेल्या तंबाखुच्या बारावर उजव्या हाताने छोटया छोटया टाळया देत तंबाखुची झालेली धूळ फूकून उडवून लावली. आणि मग त्या उरलेल्या चोळलेल्या तंबाखुची चिमुट करून आपला गाल एका हाताने ओढत दाताच्या आणि गालाच्या फटीत ठेवली.
" सरपंचाच घर कुठे आहे? " गणेशने त्या खेडूताला विचारले.
तो खेडूत लाकडाच्या ओंडक्यावरून उठून गणेशच्या समोर उभा राहिला.
गणेश त्याच्याकडून उत्तराची अपेक्षा करीत उभा राहिला. पण तो त्याला एखादया मुक्या माणसासारखे हातवारे करून खुणावू लागला. शेवटी त्याने गणेशला बाजूला सारत त्याच्या तोंडात जमलेली तंबाखुची लाळ एका बाजूला पचकन थूकली आणि म्हणाला,
" सरपंचाकडच पाव्हनं व्हय? "
' हो' गणेशने डोकं हलवून उत्तर दिलं.
त्या खेडूताने लगबगीने गणेशच्या हातातली बॅग आपल्या हातात घेतली आणि तिथून निघत म्हणाला,
" या माह्या मांगं"
किती भला माणूस आहे...
आपण रस्ता विचारला अन् हा आपली बॅग उचलून घेत आपल्याला पोहचवून सुध्दा देतोय...
गणेशने विचार केला. गणेश मुकाटयाने त्याच्या मागे मागे चालू लागला.
" तालूक्यातून आला व्हय? " त्याने दुसऱ्या हाताने आपलं धोतर नीट करीत विचारले.
" हो" गणेश म्हणाला.
कदाचित सरपंचाने याला आपल्याला घ्यायलाच तर नाही ना पाठविले?...
गणेशने विचार केला.
" मला घ्यायला सरपंचांनी पाठविलं का तुला?" गणेशने न राहवून विचारले.
" आवो नाय... सरपंचाचं पाव्हनं म्हंजे ... या गावचं पाव्हनं" तो गणेशच्या प्रश्नाचा मतितार्थ समजून म्हणाला.
" आमचे सरपंच म्हंजे या गावची श्यान हाय ... या गावची जीबी सुदारना झाली ... ती सरपंचामुळं... आंधी इथं भूर्मलबी येत नव्हती... "
" भूर्मल" गणेशने न कळून विचारले.
" आवो... म्हंजे .. एस्टी... तुमची ते बस..." तो खळखळून हसत म्हणाला.
तो पुढे बोलायला लागला " आवो एकडाव आसंच झालं... आमच्या चूलतीच्या भावाच्या पोरानं शहरातली बायको आणली... आवो ते माणसं लई माणूसकीचे.... लगीन लई धूमधडाक्यात केलं.... ते लोकंबी चाटच झाले व्हते... त्यानं मलं बी बलवलं होतं लगनालं .... एकडाव घरात सगळे जण पंगतीनं जेवाया बसले... ती बिचारी नवीन नवीन नवरी आपली वाढू लागली... जवा ती तिच्या नवऱ्यालं शार वाढू लागली ... तो मनला बस... बिचारी कावरीबावरी झाली अन् इकडं तिकडं बगू लागली... तिकडं पळीतून शारीची धार आपली चालूच व्हती... आमच्या चूलत्याचं पोरगं लई तापट ... वरडलं की हो ते तिच्यावर ... ते जोरानं वरडलं .. 'बसकी...' काय करणार बिचारी भीली ... अन् पटकन बसली की हो त्याच्या म्होरं तिथंच"
गणेश खळखळून हसायला लागला. तो खेडूत सुध्दा हसायला लागला.
" आता तुमी बगान कदी तिच्याकडं ... तुमाला वळखू येणार नाय की त्यानं शहरातली बायको आनली म्हून... लय टरेन केलं तिले आमच्या चूलतीच्या भावाच्या पोरानं... आता मस्त जाते माणसांच्या मागं शेतात ... निंदन खुडन कराया... " त्याने मागे गणेशकडे वळून बघत म्हटलं.
गणेश त्याच्याकडे पाहून गालातल्या गालात हसला.
" तुम्ही तर फार मजेदार गोष्टी करता राव.... अरे हो तुमचं नाव तर मी विचारायचं विसरूनच गेलो"
" सदा ... सदा हाय माझं नावं"
" म्हणजे तुम्ही सदा असेच गप्पा करीत अससाल म्हणून कदाचित तुमचं नाव सदा ठेवलं असेल" गणेश गमतीने म्हणाला.
" काय सायेब तुमीबी थट्टा करता या गरीबाची" तो लाजून म्हणाला.
चालता चालता ते एका मोठ्या मैदानातून जाऊ लागले.
" इथं आमच्या गावचा बजार भरते बगा... बस्तरवारी" सदा म्हणाला.
"बस्तरवारी?"
"म्हंजी गुरुवारी सायेब" तो हसत म्हणाला.
" अच्छा " गणेश त्या मैदानावर नजर फिरवीत म्हणाला.
बस्तरवार ... म्हणजे बृहस्पतीवारचा अपभ्रंश असावा कदाचित...
गणेशने विचार केला.
मग सदाने गणेशला दोन तीन छोट्या छोट्या बोळीतून नेले. समोर एका जागी गावातला मारोतीचा पार लागला.
पार बराच उंच होता. बाजूला एक मोठं वडाच झाड होतं. आणि वडाच्या झाडाच्या शेजारी पाणी पुरवठा विभागाने बांधलेली मोठी सिमेंटची पाण्याची टाकी होती.
" हयो आमच्या गावचा पार सायेब इथं या वडाच्या झाडामूळं लई मस्त थंडगार सावली पडते ... माणसतं बसतातच ...अन् थकली भागली कुत्री मांजरं ढोरंबी बसतात इथं ...वडाच्या सावलीला. "
" तुमच्या गावात नळ आलेला दिसतो" पाण्याच्या टाकीकडे पाहत गणेशने विचारले.
पाण्याच्या टाकीवर दोन तीन इब्लीस पोरं चढून खेळत होती.
" नळ कशाचा सायेब ... बांधून ठेवली नुस्ती टाकी ... कव्हा कव्हा उन्हाळयात सोडतात की पाणी या टाकीत... तव्हा मंग लई गर्दी होते इथं लोकांची "
तेवढ्यात एक टपोरं लालभडक उंबर वडाच्या झाडावरून खाली पडलं. तिथं उभी असलेली दोनचार पोरं तिकडे धावली. त्यातल्या एकाने चपळतेने ते उंबर उचललं आणि तो बाकीच्या पोरांना वेडावून वाकुल्या दाखवू लागला. त्या पोराने मग ते उंबर अलगद उकलून त्यातले बारीक बारीक किडे साफ करून बाकीचे पोरं त्याच्या हातातलं हिसकाटून घ्यायच्या आत पटकन तोंडात टाकलं. गणेशला ते पाहून कसंस झालं.
" आवो लय मस्त लागते.. तुमीबी एखांद्या बारीनं खावून बगा" सदा गणेशचा कसासा झालेला चेहरा बघून म्हणाला.
पाराला वळसा घालून सदा गणेशला पुढे घेऊन गेला. समोर रस्ता आधीच्या बोळींपेक्षा बराच रुंद होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूने मातीची शेणाने सारवलेली घरं होती. त्यातच डाव्या बाजूला समोर एक किराणा दूकान होतं. किराणा दुकानाच्या दोन्ही बाजूने दगडाच्या चिऱ्यांचे दोन ओटे होते. तिथे ओटयावर बरेच लोक घोळक्याने बसले होते. कुणी विडया फुंकीत होते. कुणी चिलीम भरत होते तर कुणी आपल्या चकाटया हाकीत बसले होते. सदा गणेशला तिथून घेऊन जाताच सगळया नजरा त्याच्याकडे वळून पाहू लागल्या. गणेशसुध्दा त्यांच्याकडे बघत होता. बघता बघता त्याची नजर दुकानाच्या गल्ल्यावर बसलेल्या व्यक्तीकडे गेली. त्या व्यक्तीकडे पाहून त्याला आश्चर्य वाटत होतं. ती एक सुंदर तरणी ताठी स्त्री होती. एका दुकानाच्या गल्ल्यावर तेही एका मागासलेल्या खेडयात एका सुंदर स्त्रीने बसावे याचं त्याला आश्चर्य वाटत होतं. आता त्याला लक्षात आलं की तिथे ओटयावर लोकांच मधमाश्यांसारखं मोहोळ कसं काय जमलं होतं ते. त्या गल्ल्यावर बसलेल्या स्त्रीचं राहणीमान एखादया शहरातल्या स्त्रीला लाजवेल असं होतं. तिची ती पिवळी धम्मक गोरी त्वचा. केसं लांब. ओठांवर लिपस्टीक लावल्यासारखी नैसर्गीक लाली. चेहऱ्यावर चांगलं पावडर वैगेरे लावलेलं. फक्त ते हनुवटीवरचे तीन गोंदणाचे ठीपकेच तेवढे तिच्या बाकी राहणीमानाला साजेसे नव्हते. तिने गुलाबी रंगाची पातळ साडी नेसलेली होती. आणि किंचित गर्द गुलाबी रंगाचच थोडया छोटया बाहया असलेलं ब्लाऊज घातलं होतं. त्या छोटया बाहयांमुळे तिचे ते भरीव गोरे दंड अजूनच उठावदार दिसत होते. गणेश क्षणभर थांबून तिच्याकडे बघण्याचा मोह आवरू शकला नाही. त्या स्त्रीकडे पाहून त्याला एखादया निवडूंगाच्या रानात चूकून एखादं गुलाबाचं फूल उगवावं असं वाटत होतं. पण एक गोष्ट त्याच्या लक्षात आल्यावाचून राहिली नाही की आजूबाजूचे ओटयावर बसलेले लोक गणेशकडे ज्याप्रमाणे पाहत होते त्यावरून तरी तिचंही लक्ष त्याच्याकडे जायला हवं होतं. पण ती गल्ल्यावर बसून आपले दुकानातले गिऱ्हाइक अटेंड करण्यात आणि दुकानातल्या नोकराला सुचना देण्यात मग्न होती. किंबहुना ती तसं दर्शवीत असावी. तिच्या वागण्यात एक लाघवी बेफिकीरपणा जाणवत होता. पुरूष या नात्याने एका स्त्रीने आणि तेसुध्दा आपण तिच्याकडे निरखून पाहत असता असे आपल्याकडे दुर्लक्ष करावे, गणेशला रूचले नाही. त्याचा पौरूषीक अहंकार दुखावल्या गेला होता. तसा गणेशही काही कमी सुंदर नव्हता. एकाहून एक सुंदर स्त्रिया अजूनही त्याच्या लग्नाला 5 वर्ष होऊन गेले असतांना सुध्दा त्याच्यावर भाळत होत्या. चटकन स्वतःला सावरून तो पुढे सदाच्या मागे जायला लागला. तो पुढे चालत होता. चालता चालता तो आपल्या डोक्यातले विचार झटकण्याचा प्रयत्न करीत होता. पण त्याला आपला अवमान झाल्यासारखे जाणवत होते आणि मनात उगीच एक हुरहूर लागून गेली होती.
क्रमश:...
Imagination was given to man to compensate him for what he is not, and a sense of humor was provided to console him for what he is.
scar Wilde

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment