Marathi literature books - Novel Madhurani - CH-5 उजनी

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


Marathi literature books - Novel Madhurani - CH-5 उजनी
 Read Novel - मधुराणी - Hony -  on Google Play Books Store
वाचा काही निवडक प्रतिक्रिया -  प्रतिक्रिया 
कंडक्टरने वाजविलेल्या घंटीने तो भानावर आला. गाडी थांबली. त्याने बाहेर डोकावून बघितले. उजनी अजून आली नव्हती.
" उजनी अजून किती लांब आहे? " त्याने त्याच्या शेजारी बसलेल्या खेडूताला विचारले.
" लई लांब हाय निवांत एक झोप घ्या गाव आलं की मी उठीवतो... " खेडूत म्हणाला.
'इतके गड्डे असलेल्या रस्त्यावर बस इतके धक्के देत चालली असता झोप येणं कसं शक्य आहे? ' त्याने मनाशीच विचार केला.
"धक्याचा इचार करू नगा ... असं समजा की तुमी पाळण्यात झोपले हात .... अन् कुणीतरी पाळणा हालवतो हाय"
गणेशने चमकून त्या खेडूताकडे पाहिले. त्या मनकवडया खेडूताने त्याच्या डोक्यात चाललेले विचार ताडले होते.
त्या खेडूताने पुन्हा आपली मख्ख नजर समोर रस्त्यावर खिळविली.
गणेशने पुन्हा आपल्या विचारांच्या दुनियेत प्रवेश केला.
तो तालुक्याच्या ठिकाणी चांगला रमला होता. मधल्या काळात त्याचं लग्न होऊन त्याला एक मूल सुध्दा झालं होतं.
विनय - किती गोंडस पोरगा...
अन् पहिला पोरगाच झाल्याने आईला किती आनंद झाला होता..
आपल्या परिवाराला सोडून इथे नोकरीसाठी येणे त्याच्या अगदीच जीवावर आलं होतं. पण काही इलाज नव्हता. त्याच्या बायकोला आणि मुलाला सुध्दा इथे खेडयावर आणने शक्य नव्हते. मुलाला याच वर्षी त्याने केजीला घातले होते. आणि इथे खेडयात केजी वैगेरे तर नव्हतेच शिक्षणाची इतरही एकूणच व्यवस्थित सोय नव्हती.
शेवटी आपल्या कुटूंबाच्या उत्कर्षासाठी एवाढा त्याग करणे आपल्याला आवश्यक आणि अपरिहार्य आहे...
एका ठिकाणी बसचा वेग कमी झाला आणि ती हमरस्त्यावरून उजवीकडे एका कच्च्या रस्त्यावर उतरली. जशी बस कच्च्या रस्त्यावर उतरली बसचे धक्के वाढले. गणेश समोरच्या सीटच्या दांडयाला धरून सांभाळून बसला. गणेशने खिडकीच्या बाहेर डोकावून बघितले. बाहेर हिरव्यागार शेतात मजूर निंदतांना दिसत होते. मधेच कुठेतरी विहिरीच्या बाजूला पाण्याच्या पंपाच्या पाईपमधून पडणारे काचासारखे शुभ्र पाणी. शेतातल्या छोटया छोटया गवताच्या झोपडया. वर आकाशात उडणारे पक्षी आणि त्यांना चकविण्यासाठी शेतात जागोजागी लावलेले बुजगावणे. गणेशचे मन त्या शेतातल्या दृश्यात हरवून गेले. जणू बसमध्ये लागणाऱ्या जीवघेण्या धक्यांचा त्याला विसर पडला होता. खरंच किती सुंदर जीवन आहे इथे खेडयातले. पण मग रस्त्याच्या एका बाजूने धावल्यागत चालणाऱ्या कृश काटकुळया मोळीवाल्यांना बघितल्यावर त्याचे येथील जीवनाबद्दलचे मत पुन्हा पूर्ववत झाले.
अचानक बसमध्ये प्रवाश्यांची चुळबूळ सुरू झाली. आणि धुळीचे लोट च्या लोट बसच्या चारी बाजूंनी उठले. बस गावाच्या शिवेत शिरली होती.
" आता येईल बगा उजनी" बाजूचा खेडूत म्हणाला.
बाहेर उठलेला धुळीचा लोट खिडकीतून बसमध्ये शिरला. गणेश घाई घाईने खिडकीची काच वर सरकवू लागला. पण ती खिडकीची काच जागची हलण्यास सुध्दा तयार नव्हती. तो आता उठून प्रयत्न करू लागला. तो निकरीने बसची काच बंद करण्याचा प्रयत्न करू लागला. एव्हाना धुळीने त्याचा चेहरा म्लान झाला होता. त्याच्या शेजारचा खेडूत त्याच्याकडे पाहून हसला.
"काई फायदा नाय सायेब... त्याच्यात धूळ जाऊन ते बी घट झालं... आमच्यासारखं... तुमीबी सय करून घ्या ... म्हंजी पुढं बरं पडल"
गणेशने त्या खेडूताकडे नुसते बघितले आणि मुकाटयाने खाली बसून काच बंद करण्याचा प्रयत्न सोडून दिला. अचानक घाण वासाचा दर्प खिडकीतून गणेशच्या नाकात शिरला. त्याने खिशातून रूमाल काढून आपल्या नाकाला लावला. तो खेडूत पुन्हा हसला. बस गोदरीतून चालली होती. समोरच्या काचातून गणेशला रस्त्याच्या दोन्ही बाजूने संडासला बसलेली लोक बस येत आहे असं पाहून एक एक उठतांना दिसली. जसं बसचा मान राखावा म्हणून ते अदबीनं उभे राहाल्यासारखे वाटत होते. गोदरीनंतर ओढा होता. ओढयावरचा मोडकळीस आलेला पुल ओलांडून एकदाची बस गावात शिरली.
बस गावात शिरताच चारपाच लहान लहान भोंगळ्या पोरांचा कळप बसमागे धावू लागला. त्यातचं बसच्या दुसऱ्या बाजूने चारपाच बेवारस कुत्री बसमागे धावू लागली. जणू बस आल्यामुळे त्या मरगळलेल्या खेड्यात जीवन संचारलं होतं.
' आली ... आली' म्हणून एका जागी रस्त्याच्या कडेला जमलेल्या लोकांनी तिचं स्वागत केलं.
त्या लोकांना कदाचित बसमध्ये बसून पुढे जायचं होतं. ड्रायव्हरनेसुध्दा गंमत म्हणून की काय कोणास ठाऊक बस त्या लोकांपासून बरीच समोर नेवून उभी केली. तसे ते लोक बसच्या मागे धावायला लागले. आधीच ती भोंगळी पोरं अन् कुत्री बसच्या मागे धावत होती अन् आता हे लोकही धावायला लागल्यावर दृष्य फार मजेशीर दिसत होतं.
बस थांबली तशी आत येणाऱ्यांची आणि बाहेर जाणाऱ्यांची बसच्या दारात एकच गर्दी झाली. गणेशने विचार केला एकदा गर्दी ओसरू दया मगच उतरू...
पण कुणीच थांबायला तयार नव्हते. बाहेरच्यांना आत येण्याची आणि आतल्यांना बाहेर जाण्याची जणू फार घाई झाली होती. त्यातच बाहेरचे काही लोक माकडासारखे बसच्या खिडकीला लोंबकळून खिडकीतून आत रूमाल टोपी किंवा पिशवी सिटवर ठेवून आपली जागा राखून ठेवत होते. गणेश हा सगळा गोंधळ पाहत होता. गोंधळ काही कमी होत नाही असे पाहून तो सुध्दा उतरायला लागला. उतरतांना त्याचे लक्ष एका खिडकीकडे गेलं. एका बाहेरच्या माणसाने तर हद्दच केली होती. त्याच्याजवळ जागा राखून ठेवण्यासाठी कदाचित काही सामान नसावे. त्याने चक्क खिडकीला लोंबकळून खिडकीतून त्याची चामडयाची चप्पल सिटवर ठेवली होती. गणेशला चिडही येत होती आणि हसूही येत होतं. गर्दीतून उतरतांना गणेशला गुदमरल्यासारखं होत होतं. कसातरी गणेश लोकांचे धक्के खात बसमधून उतरला. जेव्हा तो बाहेर आला, त्याचे सगळे केस गर्दीमुळे विस्कटलेले होते, कपडे चुरगळलेले होते आणि शर्टची इनही बाहेर निघाली होती. त्याला कुठे कल्पना होती की ही त्याने केलेली शर्टची कदाचित शेवटची इन असावी. बाहेर आल्याबरोबर मोकळया हवेत श्वास घेतल्यानंतर कुठे त्याला हायसं वाटल. तो तिथेच क्षणभर थांबला. पुढच्या क्षणीच ती बस सगळी धूळ आणि डिझेलचा धूर अंगावर उडवत पुढे निघून गेली.
क्रमश:..
Thought of the day -
Imagination was given to man to compensate him for what he is not, and a sense of humor was provided to console him for what he is.
scar Wilde

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

8 comments:

  1. tumhi khup surekh lihita pan tumhi taklele thought of the day sudhha khup chhan astat. mi sagale thought of the day copy karun thevle ahet.

    ReplyDelete
  2. Gwad Gwad lay Gwad

    ReplyDelete
  3. khedegavache varnan agadi surekh kele aahe.

    ReplyDelete
  4. khupach chan gawati warnan kele aahe, bole to ekdum rapchandus.........

    ReplyDelete
  5. chanach Khedya gaonch Chitrach Dolya smor ubh rahil...........

    ReplyDelete
  6. TUMHI KHUP CHANGLE LEHITA AANI LEHIT RAVHA.

    ReplyDelete
  7. hi, sir
    im rupali,, gavach varnan khup cchan ahe agdi dollya samor yete te gaon ani as vata apanch te sarva pahtoy

    ReplyDelete